by Vishwajeet Desai - Chhatrapati Shahu Maharaj

Welcome to Shahumaharaj.com
Go to content

by Vishwajeet Desai

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि आजचे कोल्हापूर

शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे कागलकर घाटगे घराण्यात झाला. 17 मार्च 1884 रोजी ते कोल्हापूरच्या छत्रपती भोसले राजघराण्यात दत्तक म्हणून आले. कागलकर घाटगे घराण्याशी छत्रपतींचे जवळचे नातेसंबंध होतेच. छत्रपती शाहू महाराजांनी त्यानंतर 38 वर्षे करवीर संस्थानचा अत्यंत आदर्श राज्यकारभार केला. दि.6 मे 1922 रोजी त्यांचा मुंबई येथे अवघ्या 48व्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यू झाला.

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शोभावेत असे उत्तुंग कार्य शाहू महाराजांनी केले. धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कोल्हापूर संस्थानच्या आधुनिक स्वरूपाची पायाभरणी त्यांनी केली. शिक्षण, आरोग्य, शेती, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रांत त्यांनी भरीव काम केलेच पण रयतेच्या उद्धारासाठी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असे धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांची राहणी साधी होती व ते निर्व्यसनी होते. राजवाड्यावर विलासी जीवनात मश्गुल न राहता ते शेतकरी, कामगार अशा सामान्य लोकांत मिसळून रहायचे व त्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायचे.  देशभर  सतत फिरून रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या शाहू महाराजांना 'राजर्षी' ही पदवी सार्थ ठरते.

त्यांनी भारतात प्रथमच शालेय शिक्षण सक्तीचे व मोफत केले.  सर्व जाती धर्मातील मुलांसाठी त्यांनी कोल्हापुरात मोफत वसतीगृहे स्थापन केली. कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या अनेक थोर व्यक्ती या वसतीगृहांमुळेच घडल्या. भक्तीसेवा विद्यापीठसारख्या अनेक शाळा उभारण्यास त्यांनी प्रेरणा दिली. औद्योगिक शिक्षणासाठी राजाराम इंडस्ट्रियल स्कूल सुरू केले. कृषिविकासासाठी शेतकी शाळा काढल्या, गावोगावी शेतकी प्रदर्शने भरवली, राधानगरी धरण बांधले. आजही राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा भाग सुजलाम सुफलाम आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग स्वखर्चाने बांधून इथल्या शेतमालाला विशेषतः गुळाला देशाची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. आपल्या स्वर्गीय जनक पित्याच्या स्मरणार्थ जयसिंगपूर हे व्यापारी शहर स्थापन केले. तिथे परराज्यातले व्यापारी आणून त्यांना सोयी सुविधा देऊन व्यापारास उत्तेजन दिले. लक्ष्मीपुरी व शाहूपुरी या नियोजनबद्ध व्यापारी पेठा स्थापन केल्या.

आबालाल रहिमान यांच्यासारखे अनेक थोर चित्रकार, अल्लादियाखाँ व केशवराव भोसलेंसारखे अनेक गायक, नट व इतर कलाकारांना शाहू छत्रपतींनी राजाश्रय दिला. त्यांच्या प्रेरणेने देवल क्लबची स्थापना झाली. नाट्यप्रयोगांसाठी पॅलेस थिएटर बांधले. त्यांच्याच मदतीने चित्रमहर्षी बाबुराव पेंटरांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन केली. पुढे मराठी चित्रपटसृष्टीचे कोल्हापूर माहेरघर झाले त्याची पायाभरणी शाहू महाराजांच्या कारकीर्दीत झाली होती. शाहू महाराजांचे क्रीडाप्रेम विलक्षण होते. मल्लविद्येचे ते भोक्ते होते. पॅलेस थिएटर शेजारीच त्यांनी खासबाग कुस्ती मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत शहरात अनेक तालमी सुरू झाल्या. खेडोपाड्यातील असंख्य होतकरू मुले कोल्हापुरात येऊन मल्लविद्या शिकून देशभर कीर्ती मिळवू शकली ते शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळेच.

त्यांनी 'शाहू छत्रपती स्पिनींग अँड विव्हिंग मिल्स' ही कापड गिरणी सुरू केली. शेकडो लोकांना रोजगार मिळाला. फौंड्री उद्योगाची पायाभरणी केली. कामगार चळवळीला प्रोत्साहन दिले. खास सहकार कायदा करून व सहकारी संस्थांची उभारणी करून कोल्हापुरातील सहकार चळवळीची पायाभरणी केली. लक्ष्मणराव किर्लोस्करना त्यांच्या उद्योगासाठी मदत केली. लोकमान्य टिळकांना पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटी व तिचे फर्ग्युसन कॉलेज सुरू करायला मोलाची


मदत शाहू छत्रपतींनी केली होती. त्यामुळे या संस्थेचे अध्यक्षपद कायमस्वरूपी कोल्हापूरच्या छत्रपतींकडे राहील असे संस्थेने ठरविले.

अस्पृश्यता निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केलेच. पण ते जनमानसात रूजण्यासाठी गंगाराम कांबळे या होतकरू दलित तरूणास त्यांनी हॉटेल काढून दिले. इतकेच नाही तर ते स्वतः त्याहॉटेलात जाऊन कांबळेंच्या हातचा चहा पीत. स्वतः छत्रपतींच्या या कृतीमुळे आपोआपच इतर जनतेचे मनपरिवर्तन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी मदत केली. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.  सर्व जातींतील लायक व्यक्तींना पौरोहित्याचा अधिकार मिळावा यासाठी शास्त्रोक्त शिक्षण देणाऱ्या वैदिक विद्यालयाची स्थापना केली. क्षात्रजगद्गुरूपद निर्माण केले. स्त्रियांच्या हक्करक्षणासाठी कठोर कायदे केले. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांना महाराजांनी  कोल्हापुरात सन्मानाने नोकरी दिली. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतीकारकांना त्यांनी छुपी मदत केली होती.  या बाबतीत त्यांचे लोकमान्य टिळकांनाही ब्रिटीशांच्या नकळत सहकार्य होते.

थोडक्यात अवघ्या 38 वर्षांच्या राज्यकारभारात त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या व त्यातील प्रजेच्या सर्वच क्षेत्रांतील प्रगतीसाठी आदर्शवत कार्य केले. इतके की आज त्यांच्या मृत्यूनंतर 95 वर्षांनीही संपूर्ण भारतात फुले, शाहू, आंबेडकर या नावाने पुरोगामी, विज्ञानवादी व समताधिष्ठीत विचारधारेचा सन्मान होतो.

शाहू छत्रपतींना जर ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभते तर ते 1954 पर्यंत हयात असते. त्या परिस्थितीत त्यांना कोल्हापूर परिसराच्या विकासासाठी आणखी कार्य करण्याची संधी मिळाली असती. जागतिक पातळीवरील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे कोल्हापुरात त्यांनी स्थापन केली असती. मेट्रो रेल्वे पासून ते बोईंग विमानसेवेपर्यंत वाहतुकीची सर्व साधने कोल्हापुरात उपलब्ध केली असती. जगाच्या नकाशावर कोल्हापूरचे नाव अधिक ठळक झाले असते. आजही त्यांच्या कार्याचे महत्त्व  इतके आहे की अंबाबाई व शाहू महाराज या नावांच्या पुण्याईवर कोल्हापूर जिल्हा समृद्ध, संपन्न म्हणून ओळखला जातो. शाहू छत्रपतींच्या शिक्षण, कला, क्रीडाप्रेमाचा व उद्यमशीलतेचा वारसा आज सर्व कोल्हापूरकर अभिमानाने सक्रीय जपत आहेत.

शाहू छत्रपतींचे विचार व कार्य जर त्यांच्याइतक्या तडफेने पुढे न्यायचे असेल तर आजच्या राज्यकर्त्यांसह जनतेचीही जबाबदारी आहे. नुसते 'शाहू महाराज की जय' न म्हणता आपापल्या उद्योग व्यवसायात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम असे राबवले पाहिजेत की त्यातून सामान्य जनतेचे कल्याण होईल, स्थानिक तरूणांना सन्मानाने रोजगार मिळेल व जगात कोल्हापूरचे नाव आणखी मोठे होईल.  विविध क्षेत्रांत 'मेक इन कोल्हापूर' हा जागतिक पातळीवरील विश्वासार्ह, आदर्श व लोकप्रिय असा ब्रँड होईल. जगातील सर्व मोठ्या कंपन्यांना कोल्हापूरशी औद्योगिक-व्यावसायिक संबंध जोडणे अत्यावश्यक व बहुमानाचे वाटेल.

कोल्हापूरवर आई अंबाबाईचा वरदहस्त आहे आणि राजर्षी शाहू छत्रपतींनी विकासाचा मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावरून जाऊन कोल्हापूरचे नवे विकासपर्व घडवण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. पुढच्या पिढ्यांनाही हा शाहू विचारांचा वारसा आपण जबाबदारीने सुपूर्द केला पाहिजे. कोल्हापूरकर म्हणून आपले ते परमकर्तव्य आहे. तीच लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींना खरी आदरांजली ठरेल.

विश्वजित देसाई
Vice president,
IT Association of Kolhapur
Email - vishwajithdesai@gmail.com
Mobile - 9422044462
Back to content